Monday, December 11, 2017

आता  सा-याचा कंटाळा आलाय्

तेच नातेवाईक ,तेच आतिथ्य
आता कशातच नाही वाटत तथ्य
तेच खोटं गोड हसु
सहानुभुतीचे कोरडे आसु
आता सा-याचा कंटाळा आलाय्

तेच उत्सव तेच सणवार
तीच तयारी तोच शृंगार
अन्यायाविरुद्ध वृथा एलगार
तीच पुन्हा फसलेली माघार
आता सा-याचा कंटाळा आलाय्

कुठे तरीआता हे थांबावं
नवं कांही तरी हातुन घडावं
उरातल्या हुंकाराचं काव्य व्हावं
मनाचा गाभारा फुलुन यावा
सारा कंटाळा पाचोळ्यागत
उडुन जावा!


शोभा पिंगळे

माणसं

माणसं

कांही माणसं
भेटाविशी वाटतात.
कांही माणसं
टाळाविशी वाटतात

कांही माणसं
अचानक गवसतात
कांही माणसं
नकळत हरवतात

कांही माणसांचं
प्रेम लाभतं
कांही माणसांवर
प्रेम जडतं

कांही माणसांचा
द्वेष वाटतो
कांही माणसं
आपला हेवा करतात

कांही माणसांची
वाट पाहिली जाते
कांही माणसं वाटेत साथ
सोडुन जातात

कांही माणसं
विनाकारण दुरावतात
कांही माणसं
अकारण जवळ येतात

कांही माणसांना
सोडुन जावंसं वाटतं
कांही माणसं
निराधार करुन जातात

कांही माणसांशी
खुप बोलावंसं वाटतं
कांही माणसांचं
मौन असह्य होतं

कांही माणसांशिवाय
जगु शकत नाही
कांही माणसांसाठी
मरावंसं वाटत नाही

आता कळतंय्
माणसांचं हे कोडं
सोडवणं म्हणजे
माणुसपण जपणं

शोभा पिंगळे